बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरली तपास चक्रे
बुलढाणा,जिल्ह्यात मेहकर तालुक्यात कायद्याचा धाक संपला की काय, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या गुन्हेगारांना मेहकर पोलिसांनी आपल्या धडाकेबाज कारवाईने सणसणीत चपराक दिली आहे. खामखेड रोडवरील एमआयडीसी परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करून पसार झालेल्या आरोपीला मेहकर पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली. या ‘सुपरफास्ट’ तपासामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे…
शेतात आढळला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह.
४ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास मेहकर शहराबाहेरील खामखेड रोड एमआयडीसी परिसरातील एका शेतात अज्ञात तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याची गोपनीय माहिती मेहकर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पंचनामा करण्यात आला. मृतदेहावरील जखमा आणि परिस्थिती पाहता हा घातपात असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून मृतकाची ओळख पटवली. राहुल भानुदास बाजड (वय २८ वर्षे), रा. जांब आढाव (ता. रिसोड, जि. वाशिम) असे मृताचे नाव निष्पन्न झाले. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली…
चार पथके, फॉरेन्सिक तपास आणि सायबर विश्लेषण
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलिसांनी तपासासाठी चार स्वतंत्र पथके तयार केली.
घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयाची सुई ओम शामराव केनवडकर (वय ३६ वर्षे), रा. केनवड (ता. रिसोड) याच्याकडे वळली.
पोलिसांनी तातडीने केनवड येथे सापळा रचून आरोपीला त्याच्याच शेतातून ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली.
पत्नीला त्रास देत असल्याच्या रागातून खून.
चौकशीत आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, मृतक राहुल हा मागील काही दिवसांपासून आरोपीच्या पत्नीला वारंवार त्रास देत होता. आरोपीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर संतापाच्या भरात आरोपीने ३ मार्च रोजी राहुलला विश्वासात घेऊन मेहकरच्या एमआयडीसी परिसरात नेले आणि डोक्यात दगडाने वार करून त्याची हत्या केली.
या पथकाने लावला छडा.
हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मेहकर पोलीस व सायबर सेलने रात्रंदिवस मेहनत घेतली. या कारवाईत पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्यासह सपोनि संदीप बिरांजे, अशोक अवचार, पोउपनि गणेश कड, कांचन जारवाल, पोलीस अंमलदार सुरेश काळे, सुखदेव गव्हाणे, लक्ष्मण कटक, संजय पवार, अमोल परिहार, इब्राहिम परसुवाले तसेच महिला पोलीस अंमलदार आम्रपाली सरकटे आणि सायबर सेल पथकाने मोलाची भूमिका बजावली.
पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.
अवघ्या १२ तासांत खुनाचा छडा लावून आरोपीला अटक केल्याने मेहकर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायद्याचा धाक कायम असल्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे.