
प्रतिनिधी यवतमाळ
योगेश राठोड
यवतमाळ,बंजारा समाजाचे धर्मगुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अकोला बाजार येथे बंजारा उत्सव समिती अकोला बाजार सर्कलच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. १२ फेब्रुवारीला पाम्पटीवार ग्राउंड येथे सामान्यज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १३ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय लेंगी स्पर्धा पार पडली. यात एक लाखाच्या बक्षिसांचे वाटप करण्यात आले. दोन गटांत झालेल्या स्पर्धेत पुरुष गटात गोर बंजारा सेवा संघ, पांगरी गोसावी (जि. जालना) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला, तर जय सेवालाल नंदीकेश्वर लेंगी मंडळ, भुली पोहरादेवी (ता. मानोरा, जि. यवतमाळ) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. संत सेवालाल लेंगी मंडळ, सेवादासनगर यांनी तृतीय, तर जय सेवादास लेंगी मंडळ, पाळोदी (ता. आर्णी, जि. यवतमाळ) यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. महिला गटात जय जगदंबा महिला मंडळ, चेलखा तांडा (जि. अकोला) यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर जगदंबा लेंगी मंडळ, पिंपळगाव (ता. मंगरूळपीर, जि. वाशीम) यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच शामकीमाता महिला मंडळ, खेडबिड (ता. दारव्हा, जि. यवतमाळ) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. जयंतीच्या दिवशी बंजारा समाजबांधवांनी एकत्र येऊन प्रसादाची तयारी करून भाविकांना प्रसाद वाटप केले. युवकांनी डिजेच्या तालावर उत्साहाने नृत्य करत जय सेवालालच्या जयघोषात परिसर दुमदुमून सोडला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बंजारा उत्सव समिती अकोला बाजार सर्कलचे चंदू पवार, योगेश राठोड, रोशन जाधव, चेतन पवार, कुलदीप पवार सुरज राठोड यांच्यासह समाजातील सर्व युवक मंडळांनी परिश्रम घेतले.