बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
योगेश राठोड
बुलढाणा,यवतमाळ,दि.२७ मार्च…
यवतमाळ शहरात पेट्रोल,डिझेल तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटी,यवतमाळच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.आज दि.२७ मार्च (शुक्रवार) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,सध्या यवतमाळ शहरात पेट्रोल,डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली आहे.शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असून सामान्य नागरिकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद असल्याच्या तक्रारी देखील नागरिकांकडून सातत्याने पुढे येत आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम,अस्वस्थता व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यवतमाळ शहरात साधारणतः २८ ते ३० पेट्रोल पंप विविध तेल कंपन्यांचे कार्यरत असून त्यामध्ये इंडियन ऑईल,भारत पेट्रोलियम,हिंदुस्थान पेट्रोलियम,रिलायन्स पेट्रोलियम तसेच नायरा एनर्जी या कंपन्यांचा समावेश आहे. अमरावती रोड,आर्णी रोड,वणी रोड,नागपूर रोड,दिग्रस रोड यांसारख्या प्रमुख मार्गांवरील पेट्रोल पंप शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.मात्र सध्याच्या परिस्थितीत या मार्गांवरील अनेक पेट्रोल पंप बंद असल्याचे किंवा मर्यादित पुरवठा करत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या सुमारे ७ ते १० गॅस एजन्सी कार्यरत असून त्यांच्यामार्फत इंडेन,एचपी गॅस व भारत गॅस या कंपन्यांचे सिलेंडर वितरित केले जातात.तरीही नागरिकांना गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढताना दिसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या वतीने पेट्रोल,डिझेल व गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी दिसून येत असल्याने नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यामुळे इंधन व गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ठोस नियोजन जाहीर करावे,शहरातील सर्व पेट्रोल पंप सुरू राहतील याची खात्री करावी,तसेच पेट्रोल पंपांना दररोज किती टँकरचा पुरवठा होतो आणि गॅस एजन्सीमार्फत दररोज किती सिलेंडर वितरित होतात याची पारदर्शक माहिती जनतेसमोर जाहीर करावी,अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
या प्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रा.डॉ.बबलू उर्फ अनिल देशमुख, विरोधी पक्षनेत्या वैशाली सवाई,यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमुख बगाडे,नगरसेविका साधना शंभरकर,शेतकरी चळवळीचे प्रा.पंढरी पाठे,सोशल मीडिया काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पुसनाके,अत्तरसिंग चव्हाण, नगरसेविका अमृता तिवारी,अनुप नैताम,नगरसेवक विशाल पावडे,राजेंद्र गौतम पाटील,अशोक पुसदकर, तब्बसुम शाह,तनवीर शाह,श्याम बनसोड,राजू राजगुरे,अथर्व भोयर,गजानन नवदुर्गे,रवी शंभरकर,पद्माकर इंगोले,आदी उपस्थित होते