बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज

जिल्हा प्रतिनिधी सतीश मावळ
सर्व भक्तीपंथांमध्ये योगाचा अवलंब व्हावा यासाठी पुढाकार
मेहकर येथील कीर्तनकार व नरसिंह संस्थानचे विश्वस्त हभप गोपाल महाराज पितळे यांनी ऋषिकेश येथे जाऊन ७ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय योगगुरु स्वामी चिदानंद सरस्वती यांची भेट घेऊन चर्चा केली. देशातल्या सगळ्या भक्तीपंथांचा योगप्रसाराच्या दृष्टीने समन्वय होण्यासाठी ‘राष्ट्रीय योग समन्वय समिती’चे गठन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी यावेळी पितळे महाराजांनी त्यांच्याकडे केली.
ऋषिकेश येथील परमार्थ निकेतनचे प्रमुख स्वामी चिदानंद सरस्वती हे जागतिक मान्यता असलेलं व्यक्तित्त्व आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक मंचावर त्यांनी इंग्रजीतून केलेली भाषणे गाजली आहेत. ‘गंगा आरती’ या कल्पनेचे ते जनक आहेत. योगप्रसारासाठी जगभर भ्रमंती करत असताना दरवर्षी ते ऋषिकेशला जागतिक योग महोत्सव भरवतात. यावर्षी या महोत्सवामध्ये ९२ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
भारतामध्ये वारकरी संप्रदाय, वीरशैव संप्रदाय, दक्षिणेतला अलवार पंथ, उत्तरेतला रामानंदी संप्रदाय, गुजरातचा स्वामीनारायण पंथ, बंगालचा इस्कॉन, हरेकृष्ण संप्रदाय, निरंकारी पंथ, दत्त संप्रदाय, पुष्टी मार्ग, रामानुज संप्रदाय, शाक्त संप्रदाय, महानुभाव पंथ, गायत्री परिवार, स्वाध्याय परिवार यांसारखे असंख्य भक्तीपंथ आहेत. हे सर्व पंथ आपापल्या धारणेप्रमाणे देवाची भक्ती करत असतात. मनाच्या शुद्धीसाठी देवाची भक्ती करणाऱ्या या पंथांनी तनाच्या शुद्धीसाठी योग करण्याचीही गरज आहे.
या सर्व संप्रदायांच्या धुरीणांनी आपल्या अनुयायांना योगाचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करणे गरजेचे आहे. यासाठी सर्व संप्रदायांच्या दोन-दोन प्रतिनिधींना घेऊन शासनाच्या सहयोगाने ‘नॅशनल को-ऑर्डिनेटिंग कमिटी फॉर योगा’ (राष्ट्रीय योग समन्वय समिती) गठीत करण्यात यावी व यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी पितळे यांनी स्वामीजींकडे केली. तसेच याविषयी केंद्रीय आयुष राज्यमंत्री ना.प्रतापराव जाधव यांच्याशी चर्चा करेन असे स्वामीजींना सांगितले.
चर्चेत स्वामीजींनी ही कल्पना मनापासून पटली असल्याचे सांगून सकारात्मकता दर्शवली. पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे योगदिन जगभरात साजरा होतो. त्यामुळे भारतातल्या धार्मिक क्षेत्रात योगप्रसाराची नितांत गरज आहे. याबाबत निकटच्या भविष्यामध्ये काय करता येईल याबाबत गंभीरतेने विचार करेन तसेच योग्य व्यक्तींशी संपर्क साधेन असे त्यांनी आश्वस्त केले. तसेच अभिनव विचार पुढे आणल्याबद्दल त्यांनी गोपाल महाराज पितळे यांचे अभिनंदन केले.