चारबन येथे दुर्मिळ घटना; महिलेने दिला एकाचवेळी चार बाळांना जन्म
माता व चारही नवजात सुरक्षित..
ज्ञानदेव राजनकर
जिल्हा प्रतिनिधी
बुलढाणा
जळगांव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल चारबन गावात एक अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे. गावातील पंशिराम सस्त्या यांच्या २७ वर्षीय पत्नी रियानी पंशिराम सस्त्या यांनी बुधवार (दि. ५ ऑगस्ट) रोजी घरच्या घरी प्रसूतीदरम्यान तीन मुले आणि एका मुलीला जन्म दिला. कोणत्याही विशेष वैद्यकीय सुविधेविना झालेल्या या प्रसूतीनंतर माता व चारही नवजात बालकांना तातडीने जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून आई आणि चारही बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. मात्र, चारही बालकांचा जन्म मुदतीपूर्व झाल्याने त्यांचे वजन सुमारे ९०० ग्रॅम ते १ किलो इतके असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पुढील विशेष उपचार व नवजात अतिदक्षता सेवेची गरज लक्षात घेऊन त्यांना तातडीने खामगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, एकाच वेळी चार अपत्यांचा जन्म होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असून अशा प्रसूती लाखो ते करोडो प्रसूतींपैकी एखाद्याच वेळी घडतात. अशा परिस्थितीत मुदतीपूर्व प्रसूतीमुळे नवजात बालकांचे वजन कमी असणे ही सामान्य बाब असते. सध्या खामगाव येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली माता व चारही नवजात बालकांवर उपचार सुरू असून त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
विशेष म्हणजे, रियानी पंशिराम सस्त्या यांना यापूर्वी दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्ये आहेत. आता या प्रसूतीत तीन मुले आणि एका मुलीचा जन्म झाल्याने त्यांच्या कुटुंबात एकूण सात अपत्ये झाली आहेत.
आदिवासी भागातील अत्यंत मर्यादित सुविधा, घरच्या घरी झालेली प्रसूती आणि त्यानंतर माता व चारही बालकांची प्रकृती स्थिर राहिल्याने ही घटना संपूर्ण जळगाव जामोद तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.


