बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड
जिल्हा प्रतिनिधी सतिश मवाळ

बुलढाणा,मेहकर तालुक्यातील शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर पेनटाकळी गावात राष्ट्रभक्ती, इतिहासाभिमान आणि सांस्कृतिक जाणीवेचा भव्य संगम अनुभवायला मिळाला. जय शिवराय तरुण मंडळाच्या वतीने यावर्षी शिवजयंती “नाचून नाही तर वाचून” या अभिनव संकल्पनेतून साजरी करण्यात आली आणि संपूर्ण गाव शिवमय झाले.

कार्यक्रमाची सुरुवात लोकजार सांस्कृतिक कलामंचच्या सुरेल आणि ओजस्वी गायनाने झाली.
समाजभूषण श्री ईश्वर मगर, जीवन केदळे, निलेश थोरहाते, लोणकर सर, सोनुने दादा आदी कलावंतांनी शिवचरित्रावर आधारित गीतांनी उपस्थितांच्या मनात स्वराज्याची जाज्वल्य भावना चेतवली. त्यांच्या आवाजातील जोश आणि शब्दांतील प्रेरणा यामुळे वातावरणात शिवभक्तीची स्फूर्ती दरवळली.
यानंतर *शिवव्याख्याते श्री प्रमोद टाले* साहेब यांनी “शिवराय समजून घेताना” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व विचारप्रवर्तक व्याख्यान दिले. शिवरायांचे शौर्य, दूरदृष्टी, लोकाभिमुख राज्यकारभार, स्त्रीसन्मानाची भूमिका आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांचा त्यांनी सखोल ऊहापोह केला. त्यांच्या ओजस्वी शब्दांनी उपस्थित तरुणाईच्या मनात स्वराज्याची नवी चेतना निर्माण केली.

यावेळी गावातील बालकलाकारांनी शिवरायांच्या गीतांवर सामूहिक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांच्या उत्साहाने आणि देशभक्तीच्या भावनेने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

एकूणच, जय शिवराय तरुण मंडळाने शिवजयंती केवळ उत्सव म्हणून नव्हे, तर विचार, संस्कार आणि प्रेरणेचा जागर म्हणून साजरी करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. पेनटाकळीतील यंदाची शिवजयंती खऱ्या अर्थाने ज्ञान, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचा दीपोत्सव ठरला