मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

बुलढाणा धाड पोलिसांनी गुंडांची दहशत मोडली
व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला हप्ता द्यावा लागेल म्हणत मेडिकल संचालकास मारहाण करणाऱ्या हप्तेखोर गॅंगमधील तीन आरोपींची पोलिसांनी धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढली.
दुधा येथील रहिवासी पवन राजेंद्र सोनुने (वय ३०) याचे धाड येथे गुरांच्या औषधीचे मेडिकल आहे. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सोनुने आपल्या मेडिकलकडे जात होते. यावेळी चार जणांनी पवन सोनुने यांना जगदंबा स्वीट मार्ट बिकानेरसमोर अडवून मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

दरम्यान, या घटनेनंतर याच गुन्ह्यातील काही आरोपींनी आणखी दोन हॉटेलमध्ये धुडगूस घालत हप्त्याची मागणी केली होती.

हप्ता गॅंगमधील आरोपींची दहशत वाढत चालल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. दरम्यान, ठाणेदार प्रताप भोस यांनी तपास चक्रे फिरवून आरोपींना अटक केली. तसेच ग्रामस्थांच्या मनात बसलेली भीती काढण्यासाठी आरोपींची गावातून धिंड काढण्यात आली. पोलिसांनी ग्रामस्थांचे मनोबल वाढविल्यामुळे आनंद व्यक्त होत आहे.