
बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड
बुलढाणा सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना नागरिकांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असल्याचे आवाहन बुलढाणा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. सायबर सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग आहे, असे स्पष्ट करत बुलढाणा पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष संदेश प्रसारित केला आहे.
व्हॉट्सॲपसह सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे या संदेशात नमूद करण्यात आले आहे. अनावश्यक फाइल्स, फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करू नयेत. तसेच, स्रोत माहिती नसलेल्या कोणत्याही लिंक, संदेश किंवा माहिती पुढे पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, संशयास्पद किंवा लुच्चे हालचालींचे व्हिडिओ रेकॉर्ड करणे अथवा ते सोशल मीडियावर फॉरवर्ड करणे टाळावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरिक स्वतःच सायबर गुन्ह्यांचे बळी ठरू शकतात, तसेच कायदेशीर अडचणीतही येऊ शकतात.
या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून “सतर्क रहा, सुरक्षित रहा!” असा महत्त्वाचा संदेश बुलढाणा जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलेश तांबे (भा.पो.से.) यांनी दिला आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी नागरिक आणि पोलिस यांचा समन्वय आवश्यक असून प्रत्येकाने जबाबदारीने डिजिटल माध्यमांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.
बुलढाणा पोलिस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सातत्याने नागरिकांशी संवाद साधत असून सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.