
योगेश राठोड
प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ–वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी मतदारसंघातील वाढत्या वाहतूक समस्यांचा विचार करून दिग्रस शहरासाठी बायपास तसेच वाशिम शहरासाठी रिंग रोड उभारणीसंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे निवेदन सादर केले आहे. तसेच यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांसाठी CRF (Central Road Fund) अंतर्गत प्रस्तावही सादर करण्यात आले आहेत.
खासदार देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दिग्रस शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत असून त्यामुळे वारंवार ट्रॅफिक जाम, अपघातांचा धोका आणि प्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. विशेषतः जड वाहनांची शहरातून होणारी वाहतूक नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे मनोरा बायपासपासून दारव्हा रोडला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग NH-161A ते NH-361C दरम्यान बायपास मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रस्तावित बायपाससाठी ब्रिटिशकालीन रेल्वेची उपलब्ध जमीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहणाची गरज भासणार नाही आणि प्रकल्प कमी खर्चात व लवकर पूर्ण होऊ शकतो.
तसेच वाशिम शहरातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून शहराभोवती पूर्ण रिंग रोड विकसित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग NH-161 (अकोला–हिंगोली मार्ग) वर वाशिमसाठी बायपास उपलब्ध असला तरी इतर दिशांनी येणारी वाहतूक अद्याप शहरातूनच जाते. त्यामुळे शहरात वाहतुकीचा ताण व जामची समस्या वाढत आहे.
प्रस्तावित रिंग रोड NH-161 (अकोला दिशेकडून) सुरू होऊन पुढे NH-161E व राज्य महामार्ग 183 (मंगरूळपीर – पुसद मार्ग) यांना जोडत पुन्हा NH-161 (हिंगोली दिशेकडे) जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा रिंग रोड झाल्यास वाशिम शहराभोवती पूर्ण वाहतूक वळवता येईल व शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल.
खासदार संजय देशमुख यांनी सांगितले की, या दोन्ही प्रकल्पांमुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल तसेच अकोला, हिंगोली, पुसद आणि मंगरूळपीर या भागांतील प्रवास अधिक सुरक्षित व जलद होईल.
याशिवाय यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी Central Road Fund (CRF) अंतर्गत प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आले असून या रस्त्यांना मंजुरी मिळाल्यास ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारेल, असेही त्यांनी नमूद केले.
खासदार देशमुख यांनी केंद्र सरकारने या सर्व प्रस्तावांचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.