देव,धर्म आणि देशाच्या प्रति आदर निर्माण करणे काळजी गरज- डॉ.जयंत राजूरकर
बुलढाणा दमदार २८न्यूज. मुख्य संपादक. सागर पाटील गव्हाड

बुलढाणा मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे,सकल हिंदू समाजाच्या वतीने सनातन संस्कृती, सनातन धर्म आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून आयोजित करण्यात आलेले जानेफळ येथील विशाल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. समाजात वाढत चाललेला विखुरलेपणा, मूल्यांची होत असलेली घसरण आणि आपल्या सांस्कृतिक ओळखीबाबत निर्माण होत असलेली उदासीनता या पार्श्वभूमीवर समाजाला नवी दिशा, नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास देण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

जानेफळ मध्ये दिवसभर भव्य कार्यक्रमाची रेलचेल पाहावयास मिळाली गावांमधून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात येऊन संमेलन ठिकाणी दाखल झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन करून संमेलनाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर “भारत माता की जय “सनातन धर्म की जय” अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता.सकल हिंदू संमेलन निर्वाहन समिती अध्यक्ष अशोक घाटे यांच्या हस्ते प्रमुख अतिथी श्री १००८ ह.भ.प. अमोलानंद महाराज व प्रमुख वक्ते डॉ. जयंत राजुरकर यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर हम करे राष्ट्र आराधना.. हे समुहगीत दिनेश वर्मा, नितीन बाभुळकर,महेश सवडतकर, विशाल इघवे, गजानन पाखरे,गजानन डाळीमकर,सुधीर बाभुळकर आणि संच यांनी सादर केले.
या संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री. १००८ ह.भ.प. अमोलानंद महाराज उपस्थित होते. आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सनातन संस्कृतीचे महत्व विशद केले. “सनातन धर्म हा केवळ धर्म नसून जीवन जगण्याची एक समग्र पद्धती आहे. आपली संस्कृती, परंपरा आणि मूल्ये जपली, तरच समाज मजबूत बनेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले. समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून एकत्र येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जयंत राजूरकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणातून त्यांनी सामाजिक एकतेचे महत्व अधोरेखित केले. “आज समाजात मतभेद, गैरसमज आणि विभाजन वाढत आहे. अशा वेळी सनातन विचारधारा आपल्याला एकत्र बांधण्याचे काम करते. गो-सेवा, संस्कृती रक्षण आणि समाज प्रबोधन,देव,धर्म आणि देशाच्या प्रति आदर निर्माण करणे काळजी गरज आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. युवकांनी समाजकार्याची जबाबदारी स्वीकारून सकारात्मक बदलासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

संमेलनादरम्यान विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील एकजूट, राष्ट्रप्रेम, संस्कार, कुटुंबव्यवस्था आणि परंपरांचे संवर्धन यावर विशेष भर देण्यात आला. उपस्थितांनी वक्त्यांच्या विचारांना भरभरून दाद दिली.

या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन राजू केदारे यांनी केले. तर श्याम वाळके यांनी आयोजकांच्या वतीने सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले. हे विशाल हिंदू संमेलन समाजात एकतेची भावना दृढ करणारे, आत्मविश्वास वाढवणारे आणि सनातन संस्कृतीबाबत नवचैतन्य निर्माण करणारे ठरले, असा सर्वसाधारण सूर उपस्थितांमध्ये दिसून आला. पुरुषांपेक्षा महिलांची अधिक उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. कार्यक्रमानंतर महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
हे विशाल हिंदू संमेलन यशस्वी करण्यासाठी सकल हिंदू बांधवांनी प्रयत्न केले.
