बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड

– बारामतीत जनभावनांचा महापूर; महिला कार्यकर्त्यांचा हृदयद्रावक आक्रोश
– शरद पवार आणि पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर; अवघा महाराष्ट्र हेलावला!
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज (दि. २९) जनसागराच्या साक्षीने आणि साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे चिरंजीव जय आणि पार्थ पवार यांनी दुपारी १२:०८ वाजता पार्थिवाला मुखाग्नि दिला, तर १२:१५ वाजता शासकीय इतमामात त्यांना मानवंदना देण्यात आली. लाडक्या ‘दादां’ना निरोप देताना काटेवाडीसह संपूर्ण बारामतीतील महिलांचा आणि कार्यकर्त्यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. “अजितदादा अमर रहे”च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता
अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी संपूर्ण पवार कुटुंब, राष्ट्रीय नेते, राज्यातील आजी-माजी आमदार-खासदार आणि लाखांच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी उपस्थित प्रत्येक नेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत होता. तसेच मंगलप्रभात लोढा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे यांसह मंत्रिमंडळातील अनेक आजी-माजी सदस्यांनी उपस्थिती लावली.
अजित पवारांचे पार्थिव काटेवाडी येथील निवासस्थानी आणले गेले, तेव्हा समोर निपचित पडलेल्या पार्थिवाकडे एकटक पाहणाऱ्या शरद पवारांच्या डोळ्यांतील भाव पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. हे दृश्य महाराष्ट्राच्या काळजाला थेट स्पर्श करणारे ठरले. फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून जेव्हा अंत्ययात्रा निघाली, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जनसागराचा महापूर लोटला होता. “परत या, परत या, अजितदादा परत या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. नवाब मलिक, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक निकटवर्तीयांना आपले अश्रू अनावर झाले होते.