मुख्य संपादक दमदार २८न्यूज. सागर पाटील गव्हाड

बुलढाणा मेहकर तालुक्यातील सारशिव येथील उपोषणाची शिवसेना आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते सांगता
मेहकर दि २२ तालुक्यातील
सारशिव येथील सार्वजनिक पिण्याच्या विहिरीतून सुरू असलेला बेकायदेशीर सिंचन उपसा, जिल्हा परिषद शाळेवरील अतिक्रमण, स्मशानभूमीवरील अतिक्रमण तसेच तेथे लावण्यात आलेल्या झटका मशीनविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सारशिव येथील पंकज उद्धव वाघ व मनीष जाधव यांनी दि. 19 जानेवारीपासून पंचायत समिती मेहकर कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
या आंदोलनाची दखल घेत मेहकर–लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांसह उपोषणस्थळी भेट दिली. उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्या सविस्तर ऐकून घेत त्यांनी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देत आठ दिवसांच्या आत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आदेश दिले.
यावेळी आमदार खरात यांनी गटविकास अधिकारी दिनकर खरात व इतर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करून नियमाप्रमाणे कारवाई करण्यास सांगितले. तसेच करण्यात येणाऱ्या कारवाईचा सविस्तर अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले.
या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, दत्ता मोतेकर, नगरसेवक अमर घोडे, पत्रकार रविंद्र वाघ, शाहीर देवानंद वानखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार सिद्धार्थ खरात यांच्या आश्वासनानंतर व मागण्या पूर्ण केल्या जातील या विश्वासाने उपोषणकर्त्यांचे समाधान झाले. यानंतर आमदार खरात यांच्या हस्ते चहा व पाणी देऊन उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.
या प्रकरणात सर्व कार्यवाही नियमाप्रमाणे केली जाईल व कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, असेही आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्पष्ट केले.