बुलढाणा दमदार न्यूज २८ सतिश मवाळ
बुलढाणा मेहकर तालुक्यातील येथील श्रीक्षेत्र ज्ञानमंदिर मठाच्या परिसरात संत बाळाभाऊ महाराज पितळे तथा श्वासानंद माऊली यांच्या ९६ व्या प्रणव अवतार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यमान सद्गुरु ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या सान्निध्यात १५ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान या महोत्सवात कीर्तन, प्रवचन, गाथा भजन, पालखी मिरवणूक, महाप्रसाद, आरोग्य शिबीर आदि भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
विदर्भात वारकरी संप्रदायाचे बीजारोपण करणारे संत बाळाभाऊ महाराज यांचे मेहकर हे जन्मस्थळ आणि गुरुपीठ आहे. मेहकरच्या अधिष्ठानाच्या उत्सवासह हा महोत्सव देशभरात ३४ ठिकाणी साजरा होतो. या महोत्सवात हभप कृष्णा महाराज शास्त्री मुंदेफळ, तुकाराम महाराज सखारामपूरकर, प्रा.अभिजीत महाराज देशमुख बुलडाणा, गोपाल महाराज पितळे मेहकर यांची कीर्तने आयोजित केली आहेत. १६ जानेवारीला दुपारी महाराजांच्या पालखीची नगरातून भव्य मिरवणूक निघणार आहे. यामध्ये रिंगण सोहळा साजरा होणार आहे.
याशिवाय श्री नरसिंह संस्थानच्या वतीने १६ जानेवारीला सकाळी भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर्स मोफत तपासणी करणार आहेत. महोत्सवात महंत ओंकारगिरी महाराज, म्हस्के महाराज (मुंबई), बाबाराव पाटील (रिसोड), पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्याहस्ते महाप्रसाद वितरण तर ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार, मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्याहस्ते महाआरती होणार आहे. श्री नरसिंह संस्थान व श्वासानंद सेवामंडळाच्या वतीने आयोजित या सर्व कार्यक्रमांचा तसेच आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्तांनी केले आहे.
