नाशिकमध्ये एबी फॉर्म वाटपानंतर प्रचंड राडा पाहण्यास मिळाला. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी केला. दरम्यान आज या वादाचा दुसरा अंक नाशिक रोड भागात पाहण्यास मिळाला. नाशिकमध्ये सुनील केदार हे एका कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी त्यांना अनेक कार्यकर्त्यांनी घेराव घातला. ज्यानंतर सुनील केदार यांनी तिथून काढता पाय घेतला. नाशिकमध्ये भाजपाचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं. नाशिक रोड भागात सुनील केदार एका कार्यक्रमासाठी नाशिक रोड भागात गेले होते. त्यावेळी त्यांना घेराव घालण्यात आला. कार्यकर्त्यांचा रोष पाहून सुनील केदार यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या गोटात कमालीचे नाट्य पाहायला मिळाले. भाजपाच्या आमदार सीमा हिरे आणि राहुल ढिकले मंगळवारी आपल्या पक्षातील उमेदवारांचे नामांकन अर्ज भरण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी उमेदवारी नाकारलेल्या इतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला. यादरम्यान झालेल्या गोंधळाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी फक्त चटया उचलण्यासाठीच आहेत का? असा संतप्त सवाल यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. मंगळवारी भाजपामधील जुन्या कार्यकर्त्यांनी स्थानिक नेतृत्वावर उमेदवारी नाकारल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला. यादरम्यान भाजपाच्या आमदार सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांच्याकडे पक्षाचे ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्म असल्याने उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा जोरदार पाठलाग केला. एवढ्यावरच न थांबता संतप्त कार्यकर्त्यांनी नेत्यांना गाठण्यासाठी एका फार्महाऊसवरही धाव घेतली होती. यानंतर अवघ्या एका दिवसात सुनील केदार यांना घेराव घातल्याचं पाहण्यास मिळालं. नाशिकमध्ये भाजपातील अंतर्गत कलह गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चव्हाट्यावर आला आहे. आठवड्याभरापूर्वीच भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यासह इतर स्थानिक नेत्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला होता. त्यावेळी महाजनांनी काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटातून आलेल्या नेत्यांना थेट भाजपामध्ये प्रवेश दिला होता. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपातील स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. यादरम्यान भाजपात पडलेली ही वादाची ठिगणी उमेदवारांचे नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही पाहायला मिळाली.