
हिवरा साबळे येथील परमपूज्य सखाराम महाराज संस्थानला तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा मंजूर.
बुलढाणा मुख्य संपादक दमदार २८न्यूज सागर पाटील गव्हाड
बुलढाणा,मेहकर तालुक्यातील हिवरा साबळे येथील परमपूज्य सखाराम महाराज संस्थानला अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा अखेर मंजूर झाला असून, ही मान्यता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आमदार सिद्धार्थ खरात यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे मिळाली आहे.
आज दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सन २०२५–२६ च्या ४९३ कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याचा आढावा घेण्यात आला तसेच सन २०२६–२७ च्या प्रस्तावित आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याच बैठकीत आमदार सिद्धार्थ खरात यांनी हिवरा साबळे येथील परमपूज्य सखाराम महाराज संस्थानाला तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा देण्याची ठोस मागणी मांडली. या मागणीस तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत समितीने मान्यता दिली. या निर्णयामुळे भाविकांसाठी मूलभूत सुविधा, विकास निधी व पर्यटनाच्या दृष्टीने मोठा मार्ग मोकळा झाला आहे.
यासोबतच आमदार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर येथील नृसिंह मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळूनही अद्याप निधी उपलब्ध नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच ग्रामदेवता श्री शारंगधर बालाजी मंदिर व तीर्थक्षेत्र कॉरिडोर विकासाबाबतही ठाम मागणी केली. यावर पालकमंत्री मकरंद पाटील यांनी संबंधित विषयांवर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
बैठकीदरम्यान अनेक गावांमध्ये अद्याप किमान स्मशानभूमी नसणे ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत, प्रत्येक गावासाठी किमान एक स्मशानभूमी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. त्यास आगामी वार्षिक आराखड्यात समावेश करण्याची ग्वाही देण्यात आली.
तसेच लोणार पर्यटन विकास आराखड्याची अंमलबजावणी व सिंदखेड राजा विकास आराखड्याच्या मंजुरी बाबत विशेष लक्ष देण्याचे आश्वासन पालकमंत्री व सहपालकमंत्र्यांनी दिले.
या बैठकीस आमदार चैनसुख संचेती, संजय गायकवाड, मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हिवरा साबळे येथील भाविकांसाठी ही मान्यता श्रद्धा, विकास व पर्यटनाला नवी दिशा देणारी ठरणार असून, आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.